अनोखे गोकर्ण मोदक | Ukadiche Gokarna Modak | Maharashtrian Ukadiche Modak

अनोखे गोकर्ण मोदक | Ukadiche Gokarna Modak | Maharashtrian Ukadiche Modak

Maharashtrian Ukadiche Modak: मित्रांनो गणपती तोंडावर येऊन ठेपलेले आहेत. प्रत्येक घरात गणपतीच्या आगमनाची तयारी जल्लोषात सुरू आहे. घरातील गृहिणी साफसफाई तसेच सजावटीसाठी तयारी करत आहेत आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोणते वेगवेगळे पदार्थ बनवायचे याची तयारी करताना दिसत आहेत. या गणपतीमध्ये बाप्पासाठी खास आणि विशेष असं काय करता येईल याचा विचार सुरू असतानाच गोकर्ण फुलांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. गोकर्णाची फुलं ही नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी उपयुक्त अशी आहेत.

तुम्हाला कदाचित ऐकून नवल वाटेल पण गोकर्णाच्या फुलांचा वापर करून आपण बाप्पासाठी निळ्या रंगाचे छान आणि चविष्ट असे मोदक तयार करू शकतो. याच सोबत गोकर्ण ही अनेक गुणकारी फायदे देणारी वनस्पती आहे. गोकर्णच्या पानांचा, फुलांचा, बियांचा आरोग्यासाठी उपयोग होतो.

Background story:

गोकर्ण वनस्पतीला गोकर्णी, अपराजिता म्हणून ओळखले जाते. गोकर्ण ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीची फुले गायीच्या कानासारखी असतात म्हणून ही गोकर्ण या नावाने ओळखली जाते. पाच पाकळ्यांनी बनलेल्या या फुलात एक मोठी पाकळी असते. गोकर्णाच्या वेलीला पावसाळ्यात फुलांचा बहर येतो. ही फुले सुकून गेली की शेंगा येतात. शेंगा साधारण श्रावण घेवड्याच्या शेंगेच्या आकाराच्या परंतु चपट्य़ा असतात. यातील कोवळ्या शेंगांची भाजी करता येते.

गोकर्णीच्या फुलांचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळेच अनेक रोग, व्याधी निवारण्यासाठी या फुलांचा वापर करतात. गोकर्णाच्या निळ्या फुलांपासून नैसर्गिक रंगदेखील तयार होतो. गोकर्णाची फुले सावलीत वाळवून त्यांची पावडर करतात. या पावडरचे देखील अनेक उपयोग आहेत.

गोकर्णी ही भारतीय वंशाची वेलवर्गीय सदाहरित वनस्पती आहे. गोकर्णीच्या फुलांचा रंग सामान्यत: गडद निळा किंवा पांढरा सफेद असतो. परंतु फिकट निळा, फिकट गुलाबी या रंगांची फुले असलेली गोकर्णी देखील आढळते. गर्द हिरव्या पानांत ही फुले अगदी उठून दिसतात.

गोकर्णाची लागवड बियांपासून केली जाते. शेंगा पक्व झाल्या की त्यांचा रंग बदलतो आणि त्या तडकतात. त्यातून साधारण आठ-दहा बिया मिळतात. याच बिया रुजवून गोकर्णाची नवीन रोपे तयार करता येतात. पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही मातीत या बिया अगदी सहज रुजतात. फार मेहनत करावी लागत नाही.

हेल्थ बेनिफिट:

त्वचारोग आणि कुष्ठरोग यांसारखे त्वचेसंबंधित आजार बरे करण्यासाठी गोकर्णाच्या फुलांचा वापर केला जातो. अनेक ब्युटी उत्पादनांमध्ये गोकर्णाच्या फुलांचा वापर रंगासाठी केला जातो.

शरीरामध्ये असलेले काही जुनाट आजार बरे करण्यासाठी गोकर्णाची फुले मदत करतात. तरीही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोकर्णाच्या फुलांचा वापर करावा.

गोकर्णामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त, लोह भरपूर प्रमाणात असते त्यामुळे मानसिक तणाव, थकवा कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

गोकर्ण पावसाळ्यात, हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी- खोकला त्रासांवर गुणकारी ठरते.

स्मरणशक्ती वाढण्यास मदत करते .

केसांच्या समस्या कमी करते.

गोकर्णाच्या फुलांचा वापर करून चहा, काढा बनवला जातो. जो आरोग्यासाठी चांगला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काळा चहा पिण्याऐवजी गोकर्णाच्या फुलांचा चहा बनवून प्यावा.

ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.- रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त.- हा चहा नियमित प्यायल्यास रक्त शुद्ध होते त्यामुळे त्वचेचे विकार आपोआपच कमी होतात.- बॉडी डिटॉक्स ड्रिंक म्हणून हा चहा ओळखला जातो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही या चहाचा उपयोग होतो.

शरीरातील सूज किंवा विष बाहेर काढण्यासाठी ही फुले प्रभावी ठरतात. बुद्धिमत्ता वाढवून स्मरणशक्ती वाढते.

गोकर्णाच्या फुलांपासून गणपती बाप्पाला प्रिय असणारे मोदक देखील बनवता येतात.

साहित्य:

खसखस - २ चमचे
किसलेले खोबरे - १ वाटी
बारीक गुळ - २ वाटी
तांदळाचे पीठ - १ वाटी
साजूक तूप - ४-५ चमचे
गोकर्णाची फुले - ५ ते ६

कृती:

सगळ्यात आधी मंद गॅसवर खसखस भाजून घ्या. थोडासा लालसर रंग आला की एका ताटात खसखस काढून घ्या. गरम कढईत दोन चमचे साजूक तूप घालून गुळ टाका. दोन मिनिटानंतर गुळात किसलेले खोबरे टाका आणि त्यातच लालसर केलेली खसखस टाका. झाले सारण तयार.

उकड तयार करण्यासाठी पाच सहा ताजी टवटवीत गोकर्णाची फुले घ्या. एका पातेल्यात दोन कप पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळले की त्यात गोकर्णाची फुले टाका आणि फुलांना हलवून गॅस बंद करून पाच मिनिट झाकून ठेवा. पाच मिनिटानंतर गोकर्णच्या फुलांचा रंग पाण्यात उतरलेला दिसेल. ते पाणी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये गाळून घ्या. गोकर्णाचा रंग असलेले पाणी उकळण्यासाठी गॅसवर ठेवा. पाणी उकळले की त्यात एक वाटी तांदळाचे पीठ टाकून सतत हलवत रहा. तांदळाच्या पिठाच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्या. पीठ हलवत असताना त्यात दोन चमचे साजूक तूप टाकायला विसरू नका. पाच मिनिट ही उकड मंद आचेवर शिजवत ठेवा.

तयार झालेली उकड परातीमध्ये काढून घ्या, हातामध्ये प्लास्टिकची स्वच्छ पिशवी घालून पीठ दोन मिनिट चांगलं मळून घ्या. दोन-तीन मिनिट पीठ सतत मळत राहिल्याने उकड चांगली तयार होईल. आता या तयार झालेल्या उकडीचे छोटे छोटे गोल तयार करून घ्या. गोळ्याला हाताने गोलाकार शेप देऊन त्यामध्ये गुळाचे आणि खोबऱ्याचे तयार केलेले सारण भरा. हातांच्या बोटांचा वापर करून गोळ्याला मोदकाचा आकार द्या. असे मोदक तयार करून घेतल्यानंतर इडली तयार करण्यासाठी वापरले जाणारे भांडी घ्या. इडलीच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून पाण्याला उकळी येऊ द्या त्यावर इडलीचे पात्र घेऊन तयार झालेले मोदक ठेवा आणि झाकण ठेवून पाच मिनिट मोदक चांगले शिजू द्या.

पाच मिनिटानंतर झाकण काढले की तुमचे उकडीचे मोदक तयार झालेले असतील. हे मोदक एका ताटात काढून घ्या आणि गरमागरम मोदकांवर तुपाची धार सोडून मोदकांचा आस्वाद घ्या.

-By Aparna Kulkarni 

Back to blog

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.