पानांवर का जेवतात? | Why Do People Eat on Banana Leaves?

पानांवर का जेवतात? | Why Do People Eat on Banana Leaves?

Why Do People Eat on Banana Leaves?: नमस्कार मंडळी, आज तुम्हा सर्वांसाठी पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. मंडळी जेवायला बसण्यासाठी आपण स्टीलच्या, पितळेच्या आणि चांदीच्या भांड्यांचा वापर करतो. सर्वसाधारण कुटुंबांमध्ये स्टीलच्या भांड्यांमध्ये जेवण घेतले जाते. कारण स्टीलच्या भांड्यामध्ये जेवण केल्यामुळे शरीराला कसल्याही प्रकारचा अपाय होत नाही.

जेवण तयार करताना साधारणपणे लोखंडी तव्याचा तसेच हिंडालियमच्या भांड्यांचा वापर केला जातो कारण त्यावर असलेल्या कॉपरचा थर आपल्या अन्नाला जास्त पोषक बनवतो तर लोखंडी तव्यामधील लोह अन्नामध्ये उतरते आणि लोहयुक्त अन्न आपण सेवन करतो. प्रत्येक गोष्ट करण्यामागे काही ना काहीतरी कारण असतं आणि त्याचा विचार करूनच आपण त्या पद्धती आमलात आणतो.

आज एक अशीच उपयोगी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे जेवणाचा स्वाद तर वाढेलच शिवाय सकसपणा सुद्धा तितकाच वाढेल.

आपण जेवण बनवताना जसे कोणत्या भांड्यात बनवावं ज्यामुळे ते अधिक पोषक होईल याचा विचार करतो त्याचप्रमाणे कशात जेवावे याचा देखील विचार करायला हवा. तुम्हाला प्रश्न पडेल की आता स्टीलच्या, पितळेच्या किंवा चांदीच्या भांड्यात न जेवता कशात जेवण करावं म्हणजे ते अधिक पोषक होईल आणि तब्येतीसाठी चांगलं असेल ?? तर याचा एक सर्वोत्तम उपाय म्हणजे निसर्ग. निसर्गाकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे किंबहुना असं म्हणूया की प्रत्येक आजारावर उपचार म्हणून निसर्ग आपल्यासमोर उभा आहे अगदी दत्त स्वरूपामध्ये. आपण त्याकडे बारकाईने लक्ष देत नाही इतकच.

निसर्गाचा सगळ्यात मोठा स्त्रोत म्हणजे झाडे आणि झाडांवर भरपूर प्रमाणात पाने उपलब्ध असतात. निसर्गाचा प्रत्येक घटक आपल्याला काहीतरी देतोच. झाडांची पाने मानवासाठी तितकीच उपयुक्त असतात. पानांमध्ये जेवण केल्याने पानांमधील रस अन्नामध्ये मिसळतो आणि त्यामुळे अन्न अधिक रुचकर तर होतेच शिवाय पोषक बनते. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी केळीच्या (Banana Leaves) पानांचा वापर जेवण करण्यासाठी केला जातो. त्यामागे काही शास्त्रीय आणि आरोग्यासाठी हितकारक अशी कारणे देखील आहेत.

जसे की केळीच्या पानांवर अन्न खाल्ल्याने पोटाचे आजार बरे होतात किंवा नियंत्रणात तरी ठेवता येतात. याशिवाय ताप, सर्दी, जुलाबाच्या त्रासापासून सुद्धा आराम मिळतो. कारण केळीच्या पानांमध्ये आहार घेतल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. केळीच्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नामध्ये मिसळतात आणि त्याचा आरोग्याला प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो. केळीच्या पानांच्या रसामधील काही घटक हे त्वचाविकार, बद्धकोष्टता, अशक्तपणा, जुलाब या समस्यांवर आराम देण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे सणासुदीच्या दिवशी आवर्जून केळीची पाने जेवणासाठी वापरली जातात.

याशिवाय मचगंध (Teak Tree) या पानांचा वापर देखील आहारासाठी केला जातो. मचगंध या झाडाला मोठी पाने येतात शिवाय याची फुले सुद्धा खूप सुवासिक असतात. फुले सुकल्यानंतर सुद्धा या फुलांचा सुवास तसाच दरवळत राहतो, याचे लाकूड सुद्धा अत्यंत सुगंधीत असते, शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पाने सुकल्यानंतर कचरा होत नाही तर त्याचा वापर खत म्हणून केला जातो. त्यामुळे या पानांचा वापर करून आपण आहारामधील पोषक तत्वांमध्ये वाढ करू शकतो. गरम अन्न या पानांवर ठेवल्यामुळे या पानांचा रस अन्नामध्ये मिसळतो आणि लोह, कॅल्शियम युक्त असं सकस अन्न आपण खाऊ शकतो त्यामुळे कॅल्शियम आणि लोह औषध रूपाने घेण्याची गरज पडत नाही.

याशिवाय फणस (Jackfruit), कमळ (Lotus)आणि तांदळा (Rice Plant), पळस (Flame of Forest) पानांचा देखील जेवणासाठी वापर केला जातो. तांदळाच्या पानांची देठं खूप मजबूत असतात त्यामुळे त्यांना पकडून आपण त्या पानांमध्ये अन्न सेवन करू शकतो.

केळी, फणस, तांदळा, मचगंध या पानांचा ताट म्हणून वापर केल्याने अन्नातील सकसता तर वाढतेच वाढते शिवाय भांडे धुण्याचा प्रश्न देखील मिटून जातो. म्हणूनच निदान आठवड्यातील दोन दिवस तरी कोणत्याही प्रकारच्या पानांचा वापर ताट म्हणून केला तर तब्येतीसाठी सुद्धा छान होईल आणि भांडी धुण्यासाठी होणारा पाण्याचा अपव्यय सुद्धा टाळता येईल. अशाने बरेच पाणी वाचू शकेल आणि पुढे येणारी पाण्याची टंचाई काही प्रमाणात कमी करू शकू. बऱ्याच बाजूंनी विचार करायला गेलो तर पानांमध्ये जेवण केल्याने सगळीकडून आपल्याला फायदाच फायदा मिळणार आहे. म्हणून या गोष्टीचा जरा गांभीर्याने विचार करा, स्वतःची तब्येत आणि पाणी दोन्हीही वाचवा.

 

-By Aparna Kulkarni

Back to blog

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.