Ukadiche Modak: मित्रांनो आपली भारतीय संस्कृती ही विविधतेत एकतेचे प्रतीक आहे. सण,परंपरा म्हटलं की, आठवण होते ती सगळ्यांचा लाडका असलेल्या बाप्पाची. कारण बाप्पा हा विघ्नहर्ता तर आहेच शिवाय ज्ञानाचे प्रतीक आहे. बुध्दीचा देवता असलेल्या या बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नसते. श्रावण महिना सुरू होत असून सणासुदीला प्रारंभ होत आहे. लवकरच गणपती आगमन होईल. आत्तापासूनच बाजारपेठा गणपतीच्या स्वागतासाठी फुलून सज्ज झाल्या आहेत. म्हणूनच आज मोदकांची थोडी माहिती घेणार आहोत.
मोदक गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय असणारा गोड पदार्थ. मोदकाचा उल्लेख आयुर्वेद, रामायण, महाभारत येथे आढळतो. अशाच प्रकारे संगम साहित्यात मोदकांचा उल्लेख गोड पदार्थांनी भरलेल्या तांदळाच्या डम्पलिंग्स म्हणून केला आहे. हा पदार्थ मदुराईच्या प्राचीन शहरातील रस्त्यावर विकला जात होता.
पुराणामध्ये देखील मोदकांचा उल्लेख आढळलेला आहे. पार्वतीची माता मेणावती आपला नातू गणेश याला मोदक खाऊ घालत असे, असा उल्लेख पुराणात आहे. पुराणात अजून एक दंतकथा आढळून येते ती अशी की, एकदा गणपतीला खूप भूक लागली होती. माता पार्वतीने त्याची भूक शांत करण्यासाठी अनेक पदार्थ बनवले पण सगळे पदार्थ खाऊन देखील बाप्पाची भूक शांत झाली नाही. त्यावेळी माता पार्वतीने आपल्या मुलाची अतृप्त भूक भागवण्यासाठी मोदक तयार करण्यास सुरुवात केली. माता पार्वतीने बनवलेले मोदक खाताच बाप्पाची भूक शांत झाली त्यामुळेच गणेश चतुर्थीला मोदक बनवण्याची परंपरा प्रारंभ झाली.
मोदकांचा उगम महाराष्ट्र राज्यात झाला असे मानले जाते. संपूर्ण भारतामध्ये मोदकांची अनेक नावे प्रसिद्ध आहेत. तमिळमध्ये मोथागम, कन्नडमध्ये मोदका किंवा कडूबु, तेलुगुमध्ये कुडूम अशी नावांनी मोदक ओळखला जातो. महाराष्ट्रामध्ये विशेष पूजा प्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. कारण गणपतीला मोदक अत्यंत प्रिय आहेत आणि त्याला प्रिय असलेली गोष्ट देऊन त्याची भूक भागवली जाते अशी भक्तांची धारणा आहे.
मोदक साधारणपणे तीन प्रकारे केला जातो. वाफवलेले मोदक, तळलेले मोदक आणि साच्याच्या मदतीने तयार केलेले मोदक. वाफवलेल्या मोदकांना उकडीचे मोदक असे देखील म्हटले जाते. गरम गरम मोदक तुपा सोबत खाल्ल्याने त्याची चव आणखी वाढते. वाफवलेले मोदक सुद्धा चवीला चांगले लागतात पण त्यापेक्षा तळलेले मोदक चवीसाठी जास्त खमंग आणि टिकाऊ असतात.
मोदक बनवताना गुळ, ताजे किसलेले खोबरे, कणिक यांचा वापर केला जातो. उकडीचे मोदक बनवताना तांदळाचे पीठ, किसलेली खोबरे, सुकामेवा यांचा वापर प्रामुख्याने करतात. आज-काल उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांशिवाय खवा, सुकामेवा, चॉकलेट तसेच विविध रंगांचा वापर करून मोदक तयार केले जातात. तसेच मोदकांचे वेगवेगळे आकार देखील बनविले जातात. गणपतीच्या दिवसांमध्ये बनवलेले वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक भक्तगण मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करतात. बाप्पा सोबतच लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत मोदक हा पदार्थ सगळ्यांमध्येच प्रिय आहे.
मोदकांचा वापर फक्त गणपतीला नैवेद्य म्हणून न करता तब्येत सुधारणेसाठी सुद्धा केला जातो. मोदक खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे होतात. गुळाने बनवलेले उकडीचे मोदक पचनास मदत करतात, चयापचे सुधारतात आणि बद्धकोष्ठता टाळतात. गुळामध्ये समाविष्ट असलेले अँटिऑक्सिडंट आणि खनिजे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून यकृत, श्वसन मार्ग आणि पोट स्वच्छ मदत करतात. गुळ हा शरीरातील निरोगी कोलेस्ट्रॉल वाढवतो, पावसाळ्यातील जंतुशी लढतो, सर्दी आणि फ्लू सारखे आजार देखील बरे करण्यास मदत करतो.
मोदकांमुळे आहारात गुळाचा समावेश होतो आणि शरीरासाठी उपयुक्त असणारे कोलेस्ट्रॉल शरीरास मिळते तसेच प्रतिकारक शक्ती देखील वाढते त्यामुळे छोटे छोटे आजार लवकर बरे होतात.
मोद या शब्दाचा अर्थ हर्ष किंवा आनंद असा होतो. ज्यामध्ये आनंद सामावलेला आहे असा म्हणजे मोदक. मोदक या शब्दाचा अर्थ आनंदाचा छोटा भाग असा आहे तसेच मोदक हे आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतीक आहे.
तर असा हा गणपती बाप्पाचा आवडता तसेच शरीरासाठी उपयुक्त असलेला मोदक सर्वांनी आवर्जून खायला हवा.
यासोबतच जर मोदक बनवण्यास उत्सुक असाल तर आमचे मोदकाच्या कृती वरील eBook नक्की वाचा.
मोदक रेसिपी:
Download Ebook
- By Aparna Kulkarni